| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड प्रीमियर लीग 20-20 क्रिकेट स्पर्धा पंचवीस वर्षांखालील खेळांडूसाठी नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खेळांडूसाठी असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 400 खेळाडूंनी आपला सहभाग ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा समितीकडे नोंदवलेला आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणारी ही क्रिकेट स्पर्धा युवा खेळाडूंसाठी व जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. एकूण आठ संघांमध्ये ऑकॅशन पद्धतीने प्रत्येक संघ मालक खेळाडूंना आपापल्या संघात दाखल करून घेतील. या स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या खेळाडूंपैकी निवडक खेळाडूंना रायगड जिल्ह्यातील माजी खेळाडूंची तज्ज्ञ समिती नेमून त्यांच्यामार्फत आयकॉन प्लयेर्सची निवड करण्यात आली. अशा सर्व निवडक आयकॉन खेळाडूंचे जागतिक फोटोग्राफर दिनाच्या निमित्ताने झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या क्रीडांगणावरील सभामंडपात फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकूण 25 आयकॉन खेळाडू, आरपीएल कमिटी, संघ मालक, स्पर्धेतील पंच फोटो सेशनसाठी उपस्थित होते.
यावेळी आरपीएल स्पर्धा समितीचे सचिव जयंत नाईक,खजिनदार कौस्तुभ जोशी,कोर कमिटी सदस्य आनंद घरत, अॅड. पंकज पंडित, संदीप जोशी, सागर कांबळे, किशोर गोसावी, ओमेर पेणकर, अमोल येरुणकर, जयंत मोरे, संदेश गुंजाळ, प्रीतम पाटील, रणजीपटू भरत सोळंकी, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, पोयनाडच्या सरपंच शकुंतला काकडे, बबन भगत, दीपक साळवी, सुजित साळवी, अजय टेमकर, अजित चवरकर यांसह विभागातील क्रिकेटप्रेमी मंडळी उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्यात होणार्या रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी आता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
- जिल्ह्यातील होतकरु युवा खेळाडूंना आपल्या कलागुणांचा वाव मिळावा व जिल्ह्यातील खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.- राजेश पाटील, अध्यक्ष, स्पर्धा समिती