पोयनाड पोलिसांकडून बारा दिवसात गुन्हा उघडकीस
। अलिबाग । प्रतिनिधी ।
बंद घर फोडून चोरट्याने घरातील सोन्याचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या बारा दिवसात गजाआड केले आहे. या कारवाईने घरफोडीचा गुन्हा उघडकीस करण्यास पोयनाड पोलिसांना यश आले. जावयानेच सासर्याचे घर फोडल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरी केल्याची कबूली दिली.
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील गणेशनगर येथे घरफोडी करण्यात आली. पावणे सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद ठाकूर हे व त्यांचे कुटुंबिय मंगळवारी (दि.18) फेब्रुवारीला रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांकडे गावात गेले होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी ते परत आले. त्यावेळी घरातील मुख्य दरवाजाचा कुलूप तुटलेले दिसून आले. बेडरुमधील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने गायब झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी पोयनाड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्राथमिक तपासात घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने सोन्याचे मंगळसुत्र, कंठीहार, सोन्याचे सर असा एकूण 6 लाख 79 हजार 400 रुपयांचा ऐवज गायब केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, अमोल घरत, सुरेश वाघमारे, पोलीस नाईक प्रशांत पाटील, पोलीस शिपाई किशोर चव्हाण, राजकुमार केंद्रे आदी पथकाने चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असताना तक्रारदाराचा जावई याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले. देवेश पाटील असे या आरोपीचे नाव आहे. कर्जबाजारी झाल्याने चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने इतका मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उर्वरित दोन तोळे वजनाचा मुद्देमाल जप्त करणे शिल्लक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.