। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
शेंडा पार्क येथील कुष्ठरोग निर्मूलनासाठी संस्थानकालीन उभारण्यात आलेल्याच्या जुन्या इमारतीस सोमवारी (दि. 10) पहाटे भीषण आग लागली. गांजा ओढणार्यांच्या टोळक्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक संशय असला, तरी जमीन लाटण्यासाठीच हे षडयंत्र रचून कोणीतरी दुष्कृत्य केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कुष्ठरोग निर्मूलनासाठी या इमारतीला लागून असलेल्या खोल्या या घोड्यांच्या पागा म्हणून वापरल्या जात. छत्रपती राजाराम महाराजांनी या इमारतीचा परिसर व त्याला लागून 500 एकर जमीन ही कुष्ठरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी दिली. त्या काळचे सिव्हिल सर्जन डॉ. सीमेन्स यांच्या प्रयत्नांनी कुष्ठरुग्णांना राहण्यासाठी काही दगडी खोल्या बांधल्या. यात 250 हून अधिक कुष्ठरुग्ण राहत असत.
सन 1965 मध्ये शेंडा पार्क कुष्ठधाम हे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे चालवायला दिल्यानंतर कुष्ठधामच्या वैभवाला घरघर लागली. कुष्ठरोग्यांची संख्या कमी झाल्यानंतर कर्मचारीही कमी करण्यात आले. परिणामी, 2006 पासून ही इमारतसुद्धा बंद अवस्थेत होती. याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सोमवारी पहाटे लागलेल्या आगीने ही इमारत चर्चेत आली.
अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असली, तरी इमारतीचा जिना, खिडक्या, लाकडी वासे जळून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील विस्तीर्ण अशा गवताला आग लागल्याने शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आता तर या उरलेल्या शाहकालीन ऐतिहासिक वास्तूलाही आग लागल्याने यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.