। कल्याण । प्रतिनिधी ।
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही कार्यालयीन कामकाजाचे दिवस उरले असतानाही कल्याण आणि भांडुप परिमंडलातील वीज ग्राहकांकडे (कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) तब्बल 258 कोटी रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान कर्मचार्यांसमोर आहे. त्यामुळे थकित रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत रकमेचा तर इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी मुख्य अभियंत्यांसह जनमित्रांपर्यंत सर्वच स्तरावरील अधिकारी, अभियंते व कर्मचारी वाढत्या तापमानातही वसुलीच्या कामासाठी फिल्डवर आहेत. कल्याण परिमंडलात 78 कोटी 48 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल होणे बाकी आहे. यात कल्याण पूर्व आणि पाश्चिम तसेच डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत 12 कोटी चार लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. उल्हासनगर एक आणि दोन, कल्याण ग्रामीण व बदलापूर विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत 25 कोटी 27 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील ग्राहकांकडे 29 कोटी 16 लाख तर पालघर मंडलातील ग्राहकांकडे 12 कोटी एक लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलापोटी गेल्या दीड महिन्यात 25 हजार 722 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे.
भांडुप परिमंडलात 179 कोटी 43 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. यात भांडुप, मुलूंड, ठाणे एक व दोन आणि वागळे इस्टेट विभागांचा समावेश असलेल्या ठाणे मंडल कार्यालयांतर्गत 19 कोटी 75 लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. पनवेल शहर, नेरुळ व वाशी विभागांचा समावेश असलेल्या वाशी मंडलात 35 कोटी एक लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर अलिबाग, गोरेगाव, पनवेल ग्रामीण आणि रोहा विभागांचा समावेश असलेल्या पेण मंडलात वीजबिलाची 124 कोटी 67 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये थकीत वीजबिलापोटी 24 हजार 272 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु
मार्च अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल प, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.