| पुणे | वृत्तसंस्था |
अंदमान बेटांवर मान्सूननिर्मितीला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र वाऱ्यांचा वेग वाढला आहे. अंदमान बेटांवर मान्सून 21 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेसह धुळीचे वादळ सुरू होत आहे. शनिवारपासून देशातील बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागांत 4 मेपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मे महिना उजाडताच संपूर्ण देशातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे वाऱ्यांचा वेग वाढला असून, जम्मू-कश्मीर ते राजस्थानपर्यंत जोरदार वारे वाहत आहेत. तेथे ताशी 60 ते 70, तर महाराष्ट्रात ताशी 30 ते 35 इतका वेग आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही चार मेपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होत असून, विदर्भात चार मे, तर मराठवाड्यात पाच मेपासून पावसाला प्रारंभ होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही. दरवर्षी मान्सून अंदमानात 20 ते 21 मे दरम्यान येतो. एका मॉडेलच्या अंदाजानुसार तो 14 ते 19 मे, तर दुसऱ्या मॉडेलच्या अंदाजानुसार तो 21 ते 25 मेदरम्यान अंदामान-निकोबार बेटांवर दाखल होईल.
अजून अरबी समुद्रातून बाष्पवहनाच्या वेगाला बळकटी नाही. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही. फक्त विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या तामपानात घट होण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी महाबळेश्वर येथे 30.2, नाशिक 36.5, पुणे 37.7, सातारा 37 अंशांपर्यंत पारा खाली आला होता.






