पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्तुत्य उपक्रम
एसटी महामंडळासह सामाजिक संस्थांचाही पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलिबाग आगारामध्ये वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला. हा राज्यस्तरीय उपक्रम मंगळवारी (दि.14) सकाळी आगाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले, पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एसटीच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन एसटी महामंडळ अलिबाग आगार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांनीदेखील सहभाग घेतला होता.
हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक झाड लावूया आणि पर्यावरण वाचवू या’ या संकल्पनेवर अधारित हा उपक्रम घेण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणासह झाडांचे महत्व पटवून देत असताना मानवी जीवनात झाडांचे महत्व काय आहे, याची जाणीव आपल्या शैलीतून वक्त्यांनी करून दिली.
यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशीव- चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, अलिबाग आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे, स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे, ॲड. निहा राऊत, ॲड. के. डी. पाटील, जागृती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती बेलेकर, श्रीजाई फ्युचर एल. एल. पीचे संचालक डॉ. नितीन गांधी, समन्वयक ममता म्हात्रे, खंडाळेच्या कृषी सखी सविता ओव्हाळ, मंजिरी पाटील, उत्कर्षा गुरव, अप्सना शाह, सुरेंद्र घरत, रंजिता दिवकर, श्वेता पाटील, साक्षी गायकवाड, विद्या पेढवी, वैभव पाटील, माधवी पिंगळे, नलीनी म्हात्रे, योगिनी काठे, मिना कांबळे आदी वेगवेगळ्या सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, सदस्य, एसटी बस आगारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.
अलिबाग एसटी बस आगाराच्या परिसरात वेगवेगळ्या फळांची फुलांची तसेच औषधी रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या रोपांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्पदेखील यावेळी उपस्थितांनी केला. या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळासह सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला.






