शाळेचे पत्रे कोसळले; शैक्षणिक साहित्यासह अन्य वस्तूंचे नुकसान
। कुर्डुस । वार्ताहर ।
धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा अलिबाग तालुक्यातील एका शाळेला बसला आहे. अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ग्रामपंचायतीमधील रायगड जिल्हा परिषदच्या आनंदवाडी प्राथमिक शाळेवरील छप्पर उडाले आणि काही छप्पर शाळेत कोसळले आहे. शासकीय आदेशानुसार शाळा सकाळी भरून सुटल्याने शाळेत केवळ आर्थिक नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
छप्पर कोसळल्याने शाळेतील बाकांचे आणि अन्य शालोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. ऐन वार्षिक परीक्षेच्या हंगामातच पावसाने शाळेचे छप्पर कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि परीक्षा देण्यासाठी शिक्षण विभागाला तातडीने तजवीज करावी लागणार आहे.
धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. अलिबाग तालुक्यातदेखील आंबा, पांढरा कांदा आणि भाजीच्या मळ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे तर काही ठिकाणी शाळांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी छप्पर कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. या शाळेमधील 43 सिमेंटचे पत्रे, सहा बसण्याचे बाक, 60 ढापे, 8 पाईप, 2 विजेचे पंखे, 1 लाकडी टेबल, 3 खुर्च्या, 1 लोखंडी कपाट, 5 राष्ट्रीय नेते आणि स्वातंत्र्यसेनानींच्या प्रतिमा अशा प्रकारच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.
वादळाच्या तडाख्याने शाळेचे छप्पर कोसळल्यानंतर तातडीने विद्यार्थ्यांचे पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, हजर झाले. त्यांनी तातडीने मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना घटनेचा वृत्तांत कळविला. त्यानुसार मंडळ अधिकारी महेश निकम, तलाठी दयानंद सूर्यवंशी आपल्या यंत्रणेसह शाळेच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पाटील, सूर्यकांत पाटील, अॅड. अजित गोळे, जनार्दन सुर्वे, उमेश पुगावकर, मनोज थळे, रत्नप्रभा गोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐन वार्षिक परीक्षेच्या हंगामात वादळी पावसाच्या तडाख्याने आनंदवाडी शाळेला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पंधरा दिवसांनी परीक्षा सुरु होणार आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याची खरी परीक्षा शिक्षण विभागाची असणार आहे. शाळेची झालेली पडझड विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाहीना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.