बंद पडलेले पंखे, भिकार्यांच्या त्रासामुळे प्रवासी त्रस्त
। पनवेल । ग्रामीण वार्ताहर ।
ऐन उकाड्यात बंद पडलेले पंखे, पैशाची मागणी करताना नकोसा स्पर्श करणारे भिकारी, अस्वच्छता, पाण्याची समस्था, दुर्गंधी आदी विविध कारणांमुळे खारघर रेल्वे स्थानकातुन प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. त्यातच रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यानी ठिय्या मांडल्याने स्थानकाबाहेर येऊन निश्चितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. हार्बर रेल्वे मार्गांवरील खारघर रेल्वे स्थानकातुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या खारघर वसाहतीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेने प्रवास करणार्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात उपलब्ध असलेल्या सुविधा अपुर्या पडू लागल्या आहेत. सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून खारघर रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे स्थानकात निर्माण झालेल्या असुविधा दूर करण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाने काम करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षा मुळे खारघर रेल्वे स्थानकाला घरघर लागल्याची चर्चा सध्या जोर धरीत आहे.
तिकीट खिडकीवर लांबच रांगा
दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तिकीट खिडक्या मात्र बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सातपैकी केवळ एकच तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.विशेष म्हणजे, दिव्यांगासाठी राखीव असलेली तिकीट खिडकीही बंद असल्याने अपंग प्रवाशांनाही सामान्य प्रवाशांच्या रांगेत उभे राहून आपले तिकीट घ्यावे लागत आहे.
भिकार्यांचा उच्छाद
स्थानक परिसरात भिकार्यांनी उच्छाद मांडला आहे. भिकार्यामुळे स्थानकातील प्रवासी त्रस्त झाले आहेत. तिकीट बुकिंग ऑफीस, तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म, स्थानकाच्या आवारात असलेले खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल या ठिकाणी हे भिकारी भीक मागतात किंवा झोपलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. एकमेकांना अर्वांच्य भाषेत शिवीगाळ करत भिकार्यांनी रेल्वे स्थानक परिसर काबीज केला आहे.
फेरीवाले स्थानकाच्या दारात
रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्याना व्यवसाय करण्यास बंदी आहे. खारघर रेल्वे स्थानक मात्र याला अपवाद असून, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाले आपले बस्तान बसवत असल्याने प्रवशांची अडचण करणार्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
स्थानक परिसरात अस्वछता
स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या सुविधेकरीता उपलब्ध सार्वजनिक सौचालयात देखील मोठ्या प्रमाणात अस्वछतेचे वातावरण आहे.
वाहनतळ अपुरे
सिडकोने स्थानकावर चार हजार वाहने उभे करता येतील असा दृष्टीकोन ठेवून वाहनतळ उभारले आहे. स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर वाहनतळ असलेले महाराष्ट्रातील हे पहिले स्थानक आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे येथील वाहनतळ अपुरे पडत असून, अनेकजण स्थानकाच्या बाहेर जागा मिळेल तिथे वाहन उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाढती प्रवासी संख्या पाहता शासनाने खारघर रेल्वे स्थानकात सुविधा वाढवून देणे अपेक्षित आहे. जे णे करुण प्रवाशांना येणार्या अडचणी दूर होतील.
– अरुण सरनाईक, प्रवासी
रेल्वे स्थानकाबाहेर उपलब्ध असलेल्या बस थांब्यावर छत उपलब्ध व्हावे, याकरीता पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. तसेच इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करत आहे.
– निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक