कोलकाताकडून चेन्नईचे वस्त्रहरण
। चेन्नई । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत शुक्रवारी (दि.11) चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा धक्का बसला. कोलकाताने चेन्नईला 8 गडी आणि 59 चेंडू राखून पराभूत केले आहे. चेन्नईचा हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सलग पाचवा पराभव आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यानंतर एमएस धोनी या सामन्यातून नेतृत्व करत होता. मात्र, त्याच्याही नेतृत्वात संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर चेन्नईच्या या पराभवासह संघाच्या नावावर काही लाजिरवाण्या विक्रमांचीही नोंद झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला 9 बाद 103 धावाच करता आल्या आणि चेपॉकवरील ही त्यांची निचांक धावसंख्या ठरली आहे. सुरवातीचे सामने गाजवणारा रचिन रविंद्र 4 धावांवर बाद झाला. शिवम दुबने 29 चेंडूंत 31 धावांवर नाबाद राहिला. दोन जीवदान मिळालेल्या विजय शंकरने 29 धावा केल्या. या दोघांशिवाय दुहेरी आकडा गाठणारे डेव्हॉन कॉनवे (12) व राहुल त्रिपाठी (16) हे दोनच फलंदाज होते. कर्णधार धोनी फिरकीला टाळण्यासाठी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 4 फलंदाज 65 धावांवर माघारी परतले असताना त्याने आर अश्विनला (1) पुढे पाठवले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दीपक हुडा हा अतिरिक्त फलंदाज चेन्नईने उतरवला. परंतु, हुडाला खातेही उघडता आले नाही, रवींद्र जडेजाही भोपळ्यावर बाद झाला. कोलकाताकडून गोलंदाजी करताना सुनील नरीनने 3, वरुण चक्रवर्थी व हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले आहेत.
चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकताचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि सुनील नरीन या जोडीने चार षटकांत 46 धावा चोपून चेन्नईला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्यामुळे कोलकाताने चेन्नईवर एकहाती वर्चस्व गाजवले. यादरम्यान चेन्नईकडून पदार्पण करणार्या अंंशूल कम्बोजने पहिले यश मिळविले. यावेळी क्विंटन डी कॉक 16 चेंडूंत 3 षटकारांच्या मदतीने 23 धावांवर बाद झाला. तर, नरीनने 18 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकारांसह 44 धावांची वादळी खेळी केली. तसेच, कर्णधार अंजिक्य रहाणे (20) आणि रिंकू सिंग यांच्या नाबाद खेळीने कोलकाताने 10.1 षटकांतच 2 बाद 107 धावा करून विजय मिळवला. यावेळी चेन्नईच्या अंशूल कंम्बोज आणि नुर अहमय या दोघांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
लाजिरवाण्या विक्रमांची नोंद
चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 5 पराभव स्वीकारले आहेत. यापूर्वी त्यांनी 2010 आणि 2022 साली सलग 4 पराभव स्वीकारले होते. परंतु, याआधी चेन्नईने कधीही 4 पेक्षा अधिक सलग पराभव स्वीकारले नव्हते. त्याचबरोबर चेन्नईने नोंदवलेली 103 धावसंख्या ही त्यांची घरच्या मैदानातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने नोंदवलेली दुसर्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर चेपॉकवर कोणत्याही संघाकडून नोंदवण्यात आलेल्या निचांकी धावसंख्येमध्येही आता चेन्नईचा दुसरा क्रमांक लागला आहे. चेपॉकवर सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर आहे. त्यांनी चेन्नईविरुद्ध 2019 मध्ये सर्वबाद 70 धावा केल्या होत्या.