बायोगॅस प्रकल्प तीन वर्षांपासून बंद; नागरिक जीवघेण्या आजाराच्या संकटात
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळालेल्या मे. समिक्षा वेस्ट एंटरप्राईजेस इन्फ्रा प्रा. लि. या ठेकेदार कंपनीने करारातील अटी-शर्तींची उघडपणे पायमल्ली करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुदतवाढ देऊन अभय दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. परिणामी उरण शहर कचऱ्याच्या विळख्यात सापडले असून, आता या अस्वच्छतेचे रूपांतर थेट डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराच्या संकटात होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
करारानुसार घराघरातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, वीज व सेंद्रिय खत निर्मिती करणे, गांडूळ खत व कंपोस्ट प्रकल्प राबविणे बंधनकारक होते. मात्र, प्रत्यक्षात या अटींची सर्रास पायमल्ली होत आहे. कोट्यवधी रुपयांचा ठेका केवळ कागदावरच राहिला असून, शहर मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गुदमरू लागले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनाचा कणा मानला जाणारा बायोगॅस प्रकल्प तब्बल तीन वर्षांपासून बंद आहे. अत्याधुनिक यंत्रणा उभारूनही प्रकल्प सुरू न केल्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसून सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्याचा परिणाम आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
उरण नगरपारिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येत असून, शहरातील इतर नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा फैलाव होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उरणमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीतही स्वच्छता यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक भागांत घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी सर्वत्र दुर्गंधी, डास, माशा आणि साथीच्या रोगांना आयते निमंत्रण मिळत आहे. नागरिक नियमित स्वच्छता कर भरत असतानाही बदल्यात त्यांना मिळते ती घाण, दुर्गंधी आणि निष्क्रिय प्रशासन. याहून गंभीर बाब म्हणजे, करारातील अटींचा भंग, बायोगॅस प्रकल्प बंद, निकृष्ट कामकाज, वाढता डेंग्यूचा धोका आणि नागरिकांच्या तक्रारींचा ढीग असतानाही संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे “कुंपणच शेत खात आहे“ अशी संतप्त प्रतिक्रिया उरणभर उमटत आहे.
उरणकरांच्या जीवाशी सुरू असलेला हा निष्काळजीपणाचा खेळ तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर उरणमध्ये तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी उरण नगरपरिषद प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीवर राहील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.







