। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवेत भटक्या प्राण्यांवर अत्याचाराच्या सलग दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. अवघ्या 24 तासांच्या अंतराने दोन श्वानांवर अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून, या दोन्ही घटनांमागे एकच विकृत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पहिली घटना रविवारी (दि. 19) रात्री सुमारे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उलवे सेक्टर-23 येथील ‘सिद्धिविनायक प्लॅटिनम’ इमारतीजवळ घडली. येथील एका दुकानाच्या शटरजवळ 30 ते 35 वर्षे वयोगटातील एका विकृताने श्वानावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार एका महिला वकिलाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी, सोमवारी (दि. 20) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उलवे सेक्टर-3 येथील ‘जे. कुमार कन्स्ट्रक्शन’च्या पत्र्याच्या शेडजवळ विकृताने श्वानावर अत्याचार केल्याची आणखी एक घटना घडली. या प्रकरणात मनोज राजेंद्र राम (35) या विकृताने श्वानावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनांमागे एकच विकृत असण्याची शक्यता
पहिल्या घटनेतील आरोपी अजूनही अज्ञात आहे, तर दुसऱ्या घटनेतील आरोपीची ओळख पटली आहे. मात्र, दोन्ही घटनांची वेळ, ठिकाण आणि गुन्हा करण्याची पद्धत यामध्ये असलेले साम्य लक्षात घेता, या दोन्ही घटनांमागे एकाच विकृताचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या संतापजनक घटनांमुळे उलवे परिसरातील नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.







