साडेतीन हजार जणांवर हल्ला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जीवघेणा ठरत आहे. जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026 या वीस महिन्यांच्या कालावधीत साडेतीन हजारहून अधिक जणांवर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात लहान मुले, महिला व वयोवृद्ध जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये 2 हजार 651 जणांवर बाह्य रुग्ण कक्षात उपचार केले असून, 1 हजार 9 जणांना अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांना परिसरात जीव मुठीत घेऊन वावरण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. गल्लीसह वसाहती, एसटी स्थानक आणि रहिवासी भागांमध्ये मिळेल ते मासांहारी अन्न पदार्थ खाऊन मोकाट कुत्रे परिसरात फिरत आहेत. त्यामुळे लहान मुलांसह शाळकरी मुले, वयोवृद्ध व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच, रस्त्यावर दुचाकीवरून ये-जा करतानादेखील मोकाट कुत्रे हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. जिल्ह्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 2 हजार 115, त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट 2026 या कालावधीत 1 हजार 545 असे एकूण वीस महिन्यांत 3 हजार 660 जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यातील 2 हजार 651 जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्या प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 1 हजार 9 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अलिबाग-रोहा मार्गासह अलिबाग-मुरूड, अलिबाग-पेण अशा अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यांच्या वाढत्या संख्येचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्याने धावणाऱ्या वाहनांवर तसेच पादचाऱ्यांवर हल्ला करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे गरजेचे असताना निधी अभावी तसेच अपूऱ्या मनुष्यबळामुळे हे काम होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांवर अंकूश न राहिल्यास भविष्यात गावे, वाड्यांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.






