| खोपोली | प्रतिनिधी |
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.20) खोपोली येथे निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भर पावसात झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याचा आरोप करत त्याचाही निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.







