| रसायनी | प्रतिनिधी |
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. या दैदिप्यमान यशाच्या जोरावर अकॅडमीच्या दहा खेळाडूंनी आगामी राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 साठी पात्र झाले आहेत.
जेजुरी येथे झालेल्या राज्यस्तरीय खुली तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 तसेच दि. 3 ते 5 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुली तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 या दोन्ही स्पर्धांमध्ये गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी क्योरुगी व पुमसे प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीचा
नावलौकिक उंचावला.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये तृप्ती सिनलकर, अनुष्का लोखंडे, समृद्धी कापसे, नुपूर पावगे, प्रेम पाटणे, आशिष राडिये, राज जाधव, ओंकार चव्हाण, चैताली नागणे आणि श्रवण भोसले यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी वैयक्तिक तसेच सांघिक गटांमध्ये सुवर्णपदकांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. याशिवाय मोहित गांधी, दक्ष चोरगे, सिद्धार्थ शाही यांनी विविध वजनी गटात रौप्यपदके तसेच प्रणुषा रावत, तन्विता शिर्के आणि पार्थ पाटील यांनी विविध वजनी गट व पुमसे प्रकारात कांस्यपदके जिंकून अकॅडमीच्या यशात मोलाची भर घातली. तसेच चैतन्य नागणे, आरव हडके, कबीर पाल, क्षितिज सोनी, आर्या माने, प्राची गजरे, समीक्षा बोधगिरे, अंजिनी सक्सेना, दीपक ठाकूर आणि रेहान सय्यद यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अकॅडमीचा लौकिक वाढवला.
स्पर्धेच्या आयोजनात टेक्निकल डायरेक्टर
तुषार सिनलकर यांनी स्पर्धेचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत महत्त्वपूर्ण योगदान नोंदवले. अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण आणि कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या राज्यस्तरीय स्पर्धा अत्याधुनिक डिजिटल स्पर्धा व्यवस्थापन प्रणाली वापरून यशस्वीरीत्या पार पडल्या.






