पालिकेच्या आदेश झुगारुन मैदानात काम सुरू; जॉगिंग ट्रॅकचे नुकसान, प्रशासन हतबल?
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानात जॉगिंग ट्रॅकचे नुकसान करून अवाढव्य जाहिरात फलक उभारण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार समाजसेवक प्रशांत रणवरे यांनी उघडकीस आणला होता. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाची अधिकृत परवानगी नसतानाही हे काम सुरू असल्याची बाब त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर जागे झालेल्या पनवेल महानगरपालिका प्रशासनाने तातडीने काम थांबवण्याच्या सूचना देत संबंधित जाहिरात कंपनीला नोटीस बजावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पालिकेच्या सूचनांना केराची टोपली दाखवत जाहिरात कंपनीने दुसऱ्याच दिवशी पुन्हा काम सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जाहिरात कंपनीला पालिका प्रशासनाचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कळंबोलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान हे परिसरातील नागरिकांसाठी व्यायाम, जॉगिंग आणि खेळाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या मैदानातील जॉगिंग ट्रॅकला लागून अवाढव्य जाहिरात फलक उभारण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे जॉगिंग ट्रॅकचे नुकसान होत असून नागरिकांच्या सार्वजनिक सुविधेवरच गदा येत असल्याचा आक्षेप प्रशांत रणवरे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, मैदानाच्या जागेवर जाहिरात फलक उभारण्यास नियमांनुसार प्रतिबंध असताना संबंधित कंपनीकडून हे काम कशाच्या आधारे सुरू आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
रणवरे यांनी हा प्रकार पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर परवाना विभागाने तातडीने हालचाली केल्या. परवाना विभागाचे अधिकारी मधुकर पिचड यांनी जाहिरात कंपनीशी संपर्क साधून काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, या सूचनांनंतरही कंपनीने काम पुन्हा सुरू केल्याने पालिकेच्या आदेशांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, यासंदर्भात परवाना विभागाशी संपर्क साधला असता संबंधित ठिकाणचे काम तातडीने थांबवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. मात्र, केवळ तोंडी सूचना आणि नोटीस बजावण्याच्या आश्वासनापुरतीच कारवाई मर्यादित राहणार की प्रत्यक्षात काम बंद करून संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कारवाई होणार का?
महाराष्ट्र शासनाच्या 9 मे 2022 च्या जाहिरात धोरणात सार्वजनिक क्रीडांगणे, मैदाने आणि उद्यानांसारख्या मोकळ्या जागांमध्ये जाहिरात फलक उभारण्यास प्रतिबंध आहे. पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध जाहिरात फलक नियमावलीतही या धोरणाचा संदर्भ देण्यात आला आहे. असे असताना मैदानाच्या जागेवर जाहिरात फलक उभारण्याचे काम सुरू कसे झाले? याला परवानगी कोणी दिली? आणि यापूर्वी अशा जागांवर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवरही पालिका प्रशासन कारवाई करणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.






