| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे गावाच्या वेशीवर असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ असणारा पूल नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने 5 जुलैच्या मुसळधार पावसात कोसळला. त्यामुळे या गावचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर तात्पुरता तरी स्वरूपाचा पूल व्हावा, अशी मागणी केली. परंतु, गेल्या पंधरा दिवसापासून संत गतीने काम सुरू असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून, ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच, दि.21 जुलै रोजी खालापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करत येत्या सोमवारपर्यंत या पुलाची दुरुस्ती न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रवीण लाले, माजी उपसरपंच संदीप बोरले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष खाडे, ग्रामस्थ ॲड. भगवान लाले, विश्वनाथ म्हशीलकर, लक्ष्मण म्हशीलकर, प्रवीण बोरले, हरेश बोरले, जयेश खाडे, अंकुश मते, पांडुरंग धारणे, रोहन बोरले आदी प्रमुखासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.







