। पनवेल । प्रतिनिधी ।
लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट आणि जुन्या आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौक परिसरात गोळीबाराची घटना शुक्रवारी (दि.23) मध्यरात्री घडली. यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने तिघांना मारहाण केल्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या घटनेत विशाल शिंदे आणि सचिन डांगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी सागर डांगे, आकाश डांगे, गणेश लावरे, अनिकेत नरवाडे, रुद्र बारवकर यांच्यासह अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती यापूर्वी भागीदारीत लिफ्ट मेंटेनन्सची कंत्राटे घेत होत्या. मात्र, आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर कंत्राट मिळवण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री विशाल शिंदे, सचिन डांगे आणि सौरभ डुंबरे हे तिघे तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौकाजवळील मारवा इमारतीखाली उभे होते. यावेळी लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट मिळवण्यावरून तसेच जुन्या भागीदारीतील आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे तळोजा परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तळोजा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







