अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत उच्च शिक्षणाची संधी
| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी स्वरा अविनाश पाटील हिची भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपुरम येथे बी.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – एव्हिऑनिक्स ( विमान व अंतराळ तंत्रज्ञानातील इलेक्ट्रॉनिक्स ) या पुढील शिक्षणाकरिता निवड झाली आहे.
अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या IIST मध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने स्वराने आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची यशस्वी छाप उमटवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतही या यशाची अभिमानास्पद नोंद झाली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अलिबागची स्वरा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणार असून, भविष्यात देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची तिची वाटचाल सुरू झाली आहे.
स्वराच्या या उज्ज्वल यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, संचालक विक्रांत वार्डे, उपप्राचार्य निशिकांत कोळसे तसेच प्राध्यापक व कर्मचारीवृंदाने तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि अवकाश क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वराच्या या यशाने पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाली असून, तिची ही भरारी रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.







