| अलिबाग | प्रतिनिधी |
पी.एन.पी. होली चाईल्ड सीबीएसई स्कूल, वेश्वी येथे शाळेच्या वतीने संस्थेत पहिल्यांदा मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, आत्मविश्वास तसेच जागतिक प्रश्नांविषयी विचार व चर्चा करण्याची क्षमता विकसित करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता. या परिषदेत विविध शाळांमधील विद्यार्थी प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा, विचारविनिमय आणि युक्तिवाद केला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडत मुत्सद्देगिरी, सहकार्य व संवादाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर तोडगा शोधण्याचा अनुभव घेतला.
सोहळ्याच्या समारोप प्रसंगी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सहभागी होण्याचे, विविध मतांचा आदर करण्याचे आणि मुत्सद्देगिरीची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. तसेच पीएनपी संस्थेच्या मूल्यांचा आणि दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेत स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या विचारांना वारसा सन्मानपूर्वक पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते अधिकृत चिन्हाचे दिमाखदार अनावरण केले आणि पीएनपी मॉडेल युनायटेड नेशन्स सत्र प्रथमच्या प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली. संवाद, मुत्सद्देगिरी, सहकार्य आणि नेतृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समृद्ध करणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरणाऱ्या या परिषदेची भक्कम पायाभरणी या उद्घाटन सोहळ्याने केली असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

या कार्यक्रमाकरिता पीएनपी संस्थेच्या इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका एम. वेल्लैयम्माल वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, पीएनपी सायरस पूनावाला शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भुचर, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, शैक्षणिक समन्वयक राजश्री पाटील, लेखाविभाग प्रमुख मनीषा रेळकर, अंकित भानुशाली, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाकरिता प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. राजेंद्र चांदोरकर उपस्थित होते.
दोन दिवसीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पी.एन.पी. होली चाईल्ड स्टेट बोर्ड स्कूलने विजेतेपद पटकावले. विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. Best Delegate UNICEF चैतन्य बेलकर पी.एन.पी. होली चाईल्ड स्टेट बोर्ड, UNEP विवेक दास पी.एन.पी. होली चाईल्ड स्टेट बोर्ड, WHO सई पवार पी.एन.पी. होली चाईल्ड सीबीएसई, UNSC सारा कोठेकर वाय. एम. पी., सांबरी, Best Researcher WHO नक्श जैन सायरस पुनावाला, नागाव, UNICEF अद्वैत नाईक सायरस पुनावाला, नागाव, UNSC ईशांत राजपुरोहित पी.एन.पी. होली चाईल्ड सीबीएसई, UNEP श्रेयश बोंदार्डे जी.जे.एम, खालापूर, Best Speaker श्रेष्ठा पाणीकर पी.एन.पी. होली चाईल्ड सीबीएसई, पार्थ परदेशी पी.एन.पी. होली चाईल्ड स्टेट बोर्ड, उपस्थित मान्यवरांनी विजेत्या शाळांचे तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभले.






