। महाड | प्रतिनिधी ।
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता घाटमाथा आणि डोंगराळ भागांना बसू लागला आहे. रायगड जिल्ह्यासह परिसरात संततधार पाऊस सुरू असतानाच भोर तालुक्यातील हिरडोशी हद्दीतील वरंवड गावाजवळ मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीसोबत मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि झाडाझुडपांचा ढिगारा थेट पुणे–भोर मार्गावर आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली. सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड, माती आणि दरडीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्ता अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सततच्या पावसामुळे घाटरस्ते आणि डोंगराळ भागातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील ठिकाणी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






