काही तासांतच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पाटणोली गावातील आदिवासी वाडीवर घडलेल्या पाच वर्षीय निष्पाप चिमुकलीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. घरातून बेपत्ता झालेल्या रिया सागर वाघमारे (5) हिचा मृतदेह काही अंतरावरील परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर प्रकरणाचा वेगाने तपास करत पेण पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित किरण भिकू वाघमारे (24) याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रिया आपल्या आई-वडिलांसोबत घरी झोपली होती. मात्र, मध्यरात्रीनंतर ती घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान आदिवासी वाडीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वानथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. प्राथमिक तपास आणि उपलब्ध धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले.
मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, पेण येथे पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद तसेच पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण पेण तालुक्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ही घटना अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे. संशयिताला तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्या कोणालाही कायद्यापासून सूट मिळणार नाही आणि त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड







