। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-पिंपळोली या मार्गावर असलेल्या भाकरीपाडा गावाला जोडणार्या रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता 80 लाख रुपये खर्चून बनविला जात असून, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन चार महिन्यांपूर्वीच विद्यमान आमदारांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, त्या रस्त्यावर काही संरक्षण भिंत बांधण्याशिवाय कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत असून त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे.
तालुक्यातील नेरळ-पिंपळोली या मुख्य रस्त्यापासून जेमतेम 500 मीटर लांब असलेल्या भाकरीपाडा गावाला जोडणार्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार होते. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन चार महिन्यांपूर्वी आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच, 80 लाखाचा निधी देखील मंजूर झाला आहे. या निधीतून रस्त्याच्या काही भागात संरक्षक भिंती उभारण्यात येणार होत्या. त्याचवेळी खडीकरण आणि डांबरीकरण अशी कामे प्रस्तावित होती. त्यातील काही संरक्षक भिंती आणि लाल मातीचा भराव वगळता अन्य कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे भाकरीपाडा गावातील ग्रामस्थांना गावात जाणयासाठी पक्का रस्ता मिळण्याची शक्यता लांबली आहे.
सध्या त्या ठिकाणी ठेकेदाराने टाकलेली लाल मातीमुळे कोणतेही वाहन गेल्यावर मातीचा धुरळा उडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या प्रवाशांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत आहे. तर, चार महिन्यात ठेकेदाराकडून रस्त्यावर खडीकरण करण्यासाठी देखील कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण कधी होईल, याची खात्री देखील ग्रामस्थांना नाही. त्यामुळे मोठ्या हौसेने भुमीपूजन करणार्या आमदारांनी गेल्या चार महिन्यांत या रस्त्याकडे ढुंकूनही बघितले नसल्याने त्यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, या रस्त्याचा फायदा तळवडे गावातील शेतकर्यांना देखील होत असल्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी दोन्ही गावातील रहिवाशी तसेच शेतकर्यांकडून होत आहे.