। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागिरकाचा तर एक तरूण आणि तरूणीचा समावेश आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. एक तरूण आणि तरूणी दुचाकीवरून अतिशय वेगाने जात असताना त्यांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक लागताच तिघेही दूरवर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ताबडतोब जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी गाड्यांचा वेग प्रचंड असतो. ‘स्पीड थ्रिल’च्या नादात अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पोलिसांनी नागरिकांना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.







