। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांची नावं अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल इमारतीमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबीयांनी शनिवारी रात्री कलिंगड खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणं जाणवू लागली. त्यानंतर रविवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. चौघांनाही तत्काळ जे.जे रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. चारही पार्थिवांचं शवविच्छेदन करण्यात आलं असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.







