खालापूर | प्रतिनिधी |
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आज सायंकाळी साढेपाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला, पुण्याहून मुंबई कडे जाणारी बायत कुटुंबाची स्विफ्ट कार पुढे जात असलेल्या ट्रकला धडकली, या अपघातात बायत पतीपत्नी जखमी झाले परंतु त्यांचा सहा वर्षांच्या मुलाचा मात्र दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहिती नुसार आंबेगाव, पुणे येथून विलास बायत व हर्षाली बायत हे दाम्पत्य त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आराध्य समवेत मुंबई कडे स्विफ्ट कार ने निघाले होते. सायंकाळी साढेपाच च्या सुमारास त्यांची स्विफ्ट कार खोपोलीचा बोरघाट पार करून खालापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या धामणी गावाच्या हद्दीत म्हणजे महामार्गा वरील किलोमीटर 26 च्या दरम्यान भरधाव जात असताना ती समोर जात असलेल्या ट्रक वर आदळली,
या अपघातात स्विफ्ट कार चा चालक, विलास व हर्षाली बायत हे तिघेजण जखमी झाले पण गंभीर मार लागल्याने त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आराध्य मात्र वाचू शकला नाही. महामार्गावरील पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघात ग्रस्तानच्या मदतीला या ग्रुपचे सदस्य व काही नागरिकांनी मदत केली बायत दाम्पत्य व जखमी चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.