रस्तेअपघातात मृत्युच्या संख्येत भारत पहिला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात होत असलेल्या रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली. रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत भारताचा क्रमांक पहिला आणि जखमींच्या संख्येत तिसरा आहे, असे गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले. एका योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना अधिक भरपाई देण्यासाठी रस्ते मंत्रालयाने स्थायी समिती स्थापन केली आहे. ही समिती ‘हिट ण्ड रन’ मोटार अपघात योजना 2022 अंतर्गत स्थापन करण्यात आली होती. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार मंत्रालयातील संयुक्त सचिव अमित वरदान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाचे आणखी दोन सहसचिव सौरभ मिश्रा आणि अमित सिंह नेगी यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणार्‍या नुकसानभरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. सोबतच मृत्यू झाल्यास रक्कम 25 हजारांवरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे.

Exit mobile version