। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे फळ पिकांना कीडरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आंबा, काजू या फळपिकांना चांगला बहर येऊ लागला असताना, ढगाळ वातावरणामुळे ही पिके संकटात पाडण्याची भीती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये भातपिकाबरोबरच काजू, आंबा या फळ पिकांची लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत. उत्पादनवाढीला चालना देणार्या या पिकांची लागवड ठिकठिकाणी होऊ लागली आहे. तरुण शेतकरीदेखील फळपीक लागवडीवर लक्ष देत आहे. त्यामुळे फळपिकांचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र 17 हजार हेक्टर इतके असून, सुमारे 14 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यामध्ये काजूचे क्षेत्र सुमारे अडीच हजार हेेक्टर आहे. यावर्षी फळपिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने काजू, आंबा आदी पिकांना चांगला बहर आला. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी सुखावून गेला होता. मात्र, जिल्ह्यात बदलत्या तापमानाचा फटका फळपिकांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून आले. या ढगाळ वातावरणामुळे फळपिकांवर ढेकण्या, फुलकीड, फळमाशी आदी कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याचे बदलते वातावरण फळपिकांवर कीडरोग येण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या पिकांवर वेगवेगळे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शेतकर्यांनी तालुक्यातील कृषी अधिकार्यांसह तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्यास हे संकट टाळता येणार आहेत.
वंदना शिंदे,
जिल्हा कृषी अधीक्षक