अपूर्ण पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा-तळा या महत्त्वाच्या मार्गावरील सुगदरवाडी परिसरातील पुलाचे बांधकाम अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली असून, उखडलेला रस्ता, मोठमोठे खड्डे, चिखल आणि पुलावरील उघड्या लोखंडी सळ्या यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगदरवाडी परिसरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी रस्त्यावरील खड्डे दिसेनासे होत असून, अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी टळली असली तरी प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलावरील काम अपूर्ण सोडल्याने अनेक ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्यावर असून, त्या वाहनचालकांसाठी गंभीर धोका ठरत आहेत.
रोहा आणि तळा तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णवाहिका याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि पुलाचे उर्वरित बांधकाम तातडीने पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांचा संयम आता संपत चालला असून, आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू करून हा जीवघेणा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे.







