| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 79 वा वर्धापन दिन रविवारी (दि.2) आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे महामार्गालगत असलेल्या मैदानात भव्य मेळावा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित केला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 हजारहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी दिली.
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे,शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकनाथ नाईक, प्रा. एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, खजिनदार अतुल म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, संतोष जंगम, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
खालापूरमध्ये होणाऱ्या 79 व्या वर्धापन दिनाची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. तालुका स्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पदाधिकारी व तालुका तालुका स्तरावरील पदाधिकारी गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन कार्यकर्त्यांना भेटले. महिला,तरुण वर्गांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून बैठकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते, तरुण, तरुणी, कार्यकर्ते आदींनी वर्धापन दिनाला येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. नाक्या-नाक्यावर लाल बावटे व स्वागताचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे. शेकापच्या वर्धापन दिनामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. मंडपापासून पार्कींग व्यवस्था, आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी करण्यात आली आहे. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यात सामिल होणार आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना एक वेगळी उर्जा मिळणार आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.
पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा खालापूरमध्ये आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलिबाग तालुक्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी पाच हजारहून अधिक कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होणार आहेत. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेण्यात आल्या.. गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. तरुण कार्यकर्त्यांसह महिला, वयोवृध्द कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. वर्धापनदिनाला जाण्याची तयारी पुर्ण झाली आहे. प्रत्येक गाडीवर लाल बावटा असणार आहे. काहीजण दुचाकीवरून तर काहीजण तीन चाकी, चारचाकी गाडीने जाणार आहेत. काहीजण बसमार्फत या मेळाव्यापर्यंत पोहचणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कार्यकर्ते मेळाव्याला निघणार आहेत अशी माहिती शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिली.






