| रोहा | प्रतिनिधी |
लहरी वातावरणामुळे आणि पाऊस गायब झाल्याने भातपिके करपून गेली आहेत. उरलेला दाणा हाती येणार तोच सोमवारी पहाटेच्या मुसळधार अवकाळी पावसाने नासाडी केली. हे वास्तव विचारात घेत राज्य शासनाच्या दुष्काळी यादीत रोहा तालुक्याचा समावेश करावा, भाताला प्रति क्विंटल साडेतीन ते 4 हजार रुपये हमीभाव मिळावा, केवायसी यंत्रणेत तातडीने सुधारणा करावी यांसह विविध मागण्यांसाठी रोहा तालुक्यातील रोहा शेतकरी प्रतिष्ठान, बळीराजा सामाजिक शेतकरी संघटना रायगड व बळीराजा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.2) शासकीय विश्राम गृहात विशेष बैठक पार पडली. यावेळी दि.26 नोव्हेंबर संविधान दिनी तहसील प्रशासनावर धडक मोर्चा काढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, भात खरेदी विक्री फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक धामणे, बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव, अध्यक्ष विठ्ठल मोरे, अनंत मगर, दगडू बामुगडे, श्याम लोखंडे, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड, बिजामृतचे चेअरमन भारत पाटील, सुदाम महाडिक, मुकेश कुंडे, संगेश म्हात्रे, चंद्रकांत चौलकर, संतोष पडवळ, दीपक कळंबे यांसह शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






