1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
। पनवेल । प्रतिनिधी ।
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा तळोजा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शशिकला सुनिलकंठ मिश्रा (49, रा. तळोजा) या मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या जवळील पर्स हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या वर्णनाव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. तरीही सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले आणि डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तळोजा, खारघर, कामोठे, सानपाडा, वाशी, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी आणि टिळकनगर परिसरातील तब्बल 120 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तळोजा, कामोठे आणि खारघर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. या बालकाला बाल कल्याण समिती, कर्जत यांच्यासमोर हजर करण्यात आले असून, समितीच्या आदेशानुसार त्याला कर्जत येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, पोलीस निरीक्षक सागर निकम (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले तसेच अमर भोईर, विनोद डुंबरे पाटील, हरिदास करडे, संभाजी कोळेकर, सागर पाटील, विकास ठाकूर आणि दीपिका चव्हाण यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले करीत आहेत.







