मच्छिमारांना दीड कोटींचा गंडा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उदारीवर मासळी घेऊन अलिबागमधील चार मच्छिमारांना एका व्यापार्‍याने सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात उदारीवर मासळी घेऊन मच्छिमारांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांची टोळी सक्रीय झाल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबागसह आक्षी, बोर्ली, नवगाव अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळीची करोडो रुपयांची उलाढाल होते. व्यापारी मोठ्या प्रमाणात मासळी मच्छिमारांकडून विकत घेऊन ती मासळी अन्य ठिकाणी विक्रीसह वेगवेगळ्या कंपनीत प्रक्रियेसाठी पाठवितात. मच्छिमार रात्रीचा दिवस करून समुद्राच्या लाटांशी झुंज देत जिवाची पर्वा न करता मासेमारी करतात. परंतु, त्यांना फसविण्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. अलिबाग कोळीवाड्यातील बंदरावर नायाब मजिद सोलकर या व्यापार्‍याने अदिन सी फुड नावाची कंपनी तयार केली. त्याचे एक कार्यालय कोळीवाड्यात उभे केले. मच्छिमारांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून मासळी खरेदी केली. मच्छिमारांकडून घेतलेल्या मासळीचे बिल अदीन सी फूड कंपनीच्या नावाने दिले जात होते. सोलकर यांनी नऊ सप्टेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत मच्छिमार मिथुन सारंग यांच्याकडून 50 लाख रुपये, रणजीत खमीस यांच्याकडून 37 लाख रुपये, विशाल बना यांच्याकडून 30 लाख रुपये व प्रदोष तांडेल यांच्याकडून 35 लाख अशी एकूण एक कोटी 52 लाख रुपयांची मासळी उदारीवर घेतली. पैसे नंतर मिळणार या आशेने चौघांनी विश्‍वासाने मासळी उदारीवर दिली. परंतु, त्यांनी अलिबागमधील कार्यालय बंद करून ते गायब झाले. मच्छिमारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलिबाग पोलीस ठाण्यात सोलकरविरोधात लेखी तक्रार केली. तक्रार अर्जानुसार पोलिसांनी तपास केला. त्यानंतर सोलकरविरोधात गुन्हा दाखल केला. त्याने एक कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपने करीत आहेत.

मच्छिमारांची फसवणूक झाल्याची चार जणांनी लेखी तक्रार केली होती. तक्रार अर्जावरून तपासाबरोबरच पडताळणी करून घेतल्यावर व्यापारी सोलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

किशोर साळे,
पोलीस निरीक्षक

Exit mobile version