मंदिरातील गाभार्यात पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळाला संधी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
देवदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळाला विठ्ठलाच्या चरणी संगिताची साधना करण्याची संधी मिळाली. पंढरपूरातील मंदिराच्या मुख्य गाभार्यात हरिनामाचा गजर सुमधूर अशा आवाजाने घुमला.
पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळ हे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहे. पेणमधून रेल्वेने प्रवास करीत असताना प्रत्येकजण आपल्यामध्येच मग्न असल्याचे चित्र आहे. मात्र त्यावेळी शिवराय बुवा यांनी रेल्वेतील डब्यातच पनवेलपर्यंत भजन करण्यास सुरुवात केली. रेल्वेतून प्रवास करीत असताना सुमधूर आवाजामध्ये हरिनामाचा गजर होत असल्याने तेथील प्रवासीदेखील या भजनात सहभागी होऊ लागले. बोलता बोलता 40 हून अधिक जणांचा एक ग्रुप तयार झाला. नंदकुमार ठाकूर हे या भजनाचे सध्या मुख्य बुवा आहेत. त्यांच्यासोबत अलिबागमधील विनोद भोनकर व पेझारी, रोहा, पेणमधील असंख्य मंडळींनी भजनात सहभागी झाले. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पेण ते पनवेलपर्यंत भजन करीत. त्यांच्या या भजनाला रेल्वेतील प्रवाशांकडून चांगली दाद मिळू लागली. नोकरी व्यावसायासाठी रेल्वेने प्रवास करीत असताना भजन, किर्तनाचा गजर सकाळी ऐकण्यास मिळू लागल्याने प्रवाशांनादेखील आनंद वाटू लागले.
पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळामार्फत देहू-आळंदी, थेऊर ते पंढरपूर अशी देवदर्शन सहल काढण्यात आली. दोन दिवसांच्या या सहलीचा आनंद मंडळातील प्रत्येकाने मनमुरादपणे घेतला. भजन मंडळाचे मुख्य गायक बुवा नंदकुमार ठाकूर यांच्या गायकी व अप्रतिम आवाजामुळे तेथील भाविक मंत्रमुग्ध झाले. तिन्ही मंदिरात तेथील पुजार्यांनी बक्षीस रुपी थाप पाठीवर मारली. पंढरपूर येथे गेल्यावर भजनरूपी सेवा करण्याची मागणी मंदिरातील समितीकडे केली. समितीने पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या मागणीला तात्काळ दुजोरा दिला. त्यामुळे या मंडळाला विठ्ठलाच्या मंदिरात भजन करण्याची संधी प्राप्त झाली. भजनाचे मुख्य गायक नंदकुमार रणछोड ठाकूर (रा.काळेश्री-पेण) मुदुंगांची साथ साहील नंदकुमार ठाकुर (रा.काळेश्री- पेण) व विनोद भोनकर (रा.महाजने-अलिबाग) यांनी दिली. यावेळी मंडळाचे 41 सदस्य सहभागी होते. पंढरपुर येथे भजन झाल्यामुळे नंदकुमार ठाकूर व सर्व साथकरी मंडळाचे पेण तालुक्यातील प्रसिद्ध गायक ह.भ.प चंदनबुवा (तांबडशेतकर पेण) तसेच, ह.भ.प सचिन बुवा दरेकर (पोलादपूर) यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
भजनामृत स्पर्धेत उत्तम कामगिरी
पेण सुधागड व रोहा विधानसभा मतदार संघातील भजनामृत स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत मधील 154 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पेण-पनवेल रेल्वे प्रवासी भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.