| मुंबई | दिलीप जाधव |
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 10)अकराव्यांदा विधानसभेत 45 हजार 891 कोटी रुपयांच्या तुटीचा 2025-26 चा अर्थसंकल्प मांडला. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले, त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठेच उल्लेख नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. निसर्गसंपन्न कोकणाचे पाणी मराठवाडा, विदर्भासाठी वळवून कोकणावर अन्याय करण्याचे पाप सरकारने केल्याचे विरोधकांनी ठणकावले. ठेकेदारांची देयके न मिळाल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले असून, त्यांनी मागील महिन्यापासून काम बंद केल्याने राज्याचा विकासगाडा ठप्प आहे. परंतु, विकासाच्या बाता मारणार्यांना याचे सोयरसुतक नसलेल्या सरकारने कसलाच विचार न करता अर्थसंकल्पात फक्त आकडेमोड आणि आकडेफेक करीत सर्वांचीच निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली.
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. गेल्या दहा हजार वर्षात असा बोगस अर्थसंकल्प कोणी मांडला नाही. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात पत्रकार परिषदेत केली. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठे उल्लेख नाही. लाडक्या बहिणीची मते घेतली. 2100 रुपये देणार म्हणून घोषणा केली. मात्र, आता देताना निधीची तरतूदच नाही. 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. मात्र, अर्थसंकल्पामध्ये 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. 2100 रूपये द्यायचे असल्यास 64 हजार लागतील. सरकारकडे निधी कुठे आहे? म्हणजे शुद्ध फसवणूक केली आहे. शेतकर्यांची थकबाकी माफ केली नाही. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या पिकाला हमी भाव का नाही, शेतकर्यांना विजेमध्ये सवलत नको, त्यांना 24 तास वीज द्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवले होते, आता ते का ठेवले नाहीत.
अर्थसंकल्पात 60 ते 70 टक्के योजना मागील काळातल्याच आहेत. 46 टक्के निधी खर्च झालेला नाही. सर्व प्रस्तावित आहेत. मग या योजना कधी होणार? अंगणवाडी सेविकांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देणार म्हणून घोषणा केली, त्याचे काय झाले? लाडक्या ठेकेदारासाठी 64783 कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. मुंबईत दोन विमानतळे जोडण्याचे काम हे अदानी कंपनीचे असताना सरकार आपल्या मित्रासाठी जनतेचा पैसा वापरत आहेत. चिपी विमानतळ का बंद झाले, याचे उत्तर कोण देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलपूजन करण्यात आले. महाराजांचे स्मारक कधी होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरुन आमची पुढची वाटचाल असेल.
देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री
गेल्या दहा हजार वर्षांत असा बोगस अर्थसंकल्प कोणी मांडला नाही. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशी अवस्था आहे. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठेच उल्लेख नाही. लाडक्या बहिणी, शेतकर्यांची शुद्ध फसवणूक सरकारने केली आहे.
उद्धव ठाकरे,
माजी मुख्यमंत्री
हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ, निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली. लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला.
विजय वडेट्टीवारशेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना सरकारने वार्यावर सोडून दिले. महाराष्ट्र थांबणार नाही, अशी घोषणा करणार्या सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षात कर्जाच्या ओझ्याखाली राज्य असताना या अर्थसंकल्पातून महायुती सरकारने विकसित महाराष्ट्राचा डंका वाजवण्याचा प्रयत्न केला आहे.
अंबादास दानवे,
विरोधी पक्षनेते, विधानपरिषद‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही’… शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल.
अजित पवार,
अर्थमंत्रीअर्थसंकल्पात भरपूर विकासाच्या घोषणा केल्या आहेत. शहरी पाणी निस्सारण पुन्हा प्रक्रिया करणे, तापी नदी दरी प्रकल्प, पाच हजार शेतकर्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा वाढविणार दर, विविध ठिकाणी मेट्रोचे जाळे उभारणे, 50 लाख रोजगार, लाडकी बहीण योजना वाढ अशा अनेक घोषणा केल्या आहेत. सध्या अनेक योजनांमुळे ठेकेदारांची देणी बाकी आहेत. मेट्रो जाळे व शेतकर्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ देणे यासारखी घोषणा सोडली, तर बाकीचा अर्थसंकल्प फक्त विकासाचे संकल्पचित्र दाखविणारा आहे.
संजय राऊत,
सीए