। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, महाड या तालुक्यातील वाहनांना (रिक्षा व मिनिडोअर) योग्यता प्रमाणपत्रासाठी 120 किलोमीटर प्रवास करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जावे लागत आहे. तीनचाकी रिक्षा, मिनिडोअर या छोट्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरून दीर्घ प्रवास करण धोक्याचे व जिकिरीचे आहे. तरी माणगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय किंवा शाखा झाल्यास सर्वांच्या सोयीचे होईल, अशी मागणी वाहन चालक मालक संघटना यांच्याकडून केली जात आहे. मात्र, वाहतूक खात्याकडून या मागणीला दाद दिली जात नाही.
आजच्या ऑनलाईन प्रणाली व संगणकीय युगात प्रत्येक प्रमाणपत्र डिजिटल प्राप्त होत असतात. तसेच सरकारदेखील शासन आपल्या दाराशी अशा योजना राबवून विविध प्रमाणपत्र, परवाने, दस्तऐवज नागरिकांना जास्त सुलभपणे प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असते. मात्र, सदरचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड हे अद्यापदेखील बाबा आदमच्या काळात वावरत असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे गोरगरीब वाहन चालक व मालकांना होत असलेल्या या त्रासातून मुक्त करण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याकडे लक्ष देऊन माणगाव येथे कार्यालय किंवा शाखा स्थापनेबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.