न्हावाशेवा बंदरातून 15 हजार किलो रक्तचंदन जप्त

उरण | प्रतिनिधी |
दुबईला रक्तचंदन पाठवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य आरोपीला सीमाशुल्क विभागाने अटक केली. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा बंदारातून 15 हजार किलो रक्त चंदन जप्त केले आहे. आंध्र प्रदेशातून आणण्यात आलेल्या या रक्तचंदनाशी तेथील नक्षलवाद्यांचा संबंध आहे का? याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.
न्हावा शेवा बंदारवरून दुबईतील जाबेल अली बंदरावर रक्तचंदन पाठवले जाणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या विशेष तपास व गुप्तवार्ता शाखेला मिळाली होती. त्यानुसार 24 डिसेंबरला जेएनपीटी येथील जीटीआय टर्मिनस येथे शोध मोहिम राबवण्यात आली. त्यावेळी तेथे 20 फुटी कंटेनरमध्ये हे रक्तचंदन सापडले. रिकामी बाटल्या असल्याचे जाहीर करून त्याऐवजी बाटलीच्या आकारातील रक्तचंदनाचे खोड दुबईला पाठवण्यात येणार होते. या कंटेनरमध्ये 15 हजार 20 किलो रक्त चंदन सापडले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 15 कोटी दोन लाख रुपये असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले.
याप्रकरणी निर्यातदार कंपनीच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्यामुळे कोणतीही स्पष्ट माहिती सीमाशुल्क विभागाच्या हातात नव्हती. परिरातील सीसीटीव्ही व इतर कागददोपत्री माहितीच्या आधारावर हा कंटेनर बंदरावर घेऊन आलेल्या ट्रकचा क्रमांक सीमाशुल्क विभागाला मिळाला. ट्रकच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले असता त्याने तो ट्रक काही महिन्यांपूर्वीच एका मध्यस्थी व्यक्तीच्या मार्फत विकला असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभाग मुख्य आरोपी संजय विठ्ठल शिंदे(41) याच्यापर्यंत पोहोचले. शिंदे हा नवी मुंबईतील वाशी येथील रहिवासी असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

Exit mobile version