| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर 19 बंगले होते आणि त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले. मात्र, कोर्लई ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी दिलेल्या अहवालानुसार सोमय्या म्हणत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत अद्याप अहवाल शासनाकडे पाठवला नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. तर बंगले बाबत कागदोपत्री बदल केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. घोटाळ्याबाबत शासन, जिल्हा परिषद, ग्राम विकास विभाग की मी गुन्हा दाखल करावा याबाबत दोन दिवसात ठरवू, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
याबाबत सोमवारी 12 डिसेंबर रोजी किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली. दोघांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली.
रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे मालमत्ता घेतली आहे. या मालमत्तेत नाईक यांनी बंगले बांधले होते. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या बंगल्याचे असेसमेंट ही बनविण्यात आले असून कर ग्रामपंचायतीला भरत होते. त्यानंतर नाईक यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली होती. त्यावेळी जागेत 19 बंगले असल्याचा उल्लेख होता. या बंगल्याचा करही ठाकरे यांनी भरलेले आहे. मात्र त्यानंतर हे बंगले नसल्याचा अहवाल ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे बंगल्यात घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. या बंगल्याबाबत घोटाळा झाला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना दबाव आणून बंगले उडविले असल्याने त्यांनी फसवणूक केली आहे. फसवणूक करणार्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्याच्याकडे अहवाल आला आहे. याबाबत शिंदे – फडणवीस सरकारने निर्णय घ्यायचा आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाही भेटणार आहे.
या घोटाळा बाबत शासन, जिल्हा परिषद, ग्रामविकास की मी तक्रार दाखल करावी याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.