28 मेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज; भारतीय हवामान खात्याची माहिती
| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्याला रविवारी रेड अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अजून चक्रीवादळात ते रूपांतरित झालेले नाही. मात्र, दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी संपूर्ण राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते येत्या 24 तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत. त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरू आहे. आणखी दोन दिवस पाऊस कायम राहील असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यातच जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक व नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तसेच पुणे घाटमाथ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोसमी वारे केरळमध्ये दाखल
नैऋत्य मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मागील दोन दिवसांपूर्वी मोसमी वाऱ्यांची वाटचाल केरळच्या दिशेने होण्यास पोषक हवामान असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, मागील 16 वर्षांच्या तुलनेत यंदा मोसमी वारे लवकर केरळमध्ये दाखल झाले असून हा विक्रम झाला आहे. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. त्यानुसार केरळमध्ये शनिवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. गेल्या वर्षी 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच 30 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यापूर्वी 23 मे 2009 रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी शनिवार, 24 मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे.