महिलांच्या संरक्षणासाठी कायम प्रयत्न करणार; ॲड. मानसी म्हात्रे यांची ग्वाही
| अलिबाग | प्रतिनिधी |
महिलांच्या अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. वैष्णवी या तरुणीच्या मृत्यूबाबतची परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे शेकापच्या महिला आघाडीच्या वतीने या दुर्दैवी मृत्यूचा आणि या घटनेला जबाबदार असलेल्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी, शहराशहरामध्ये महिला आघाडी सक्षम करणे गरजेचे झाले आहे. शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी महिलांच्या संरक्षणासाठी काम करेल. यातून महिलांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल. वैष्णवीच्या न्यायासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, असा विश्वास शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.
शाहू, फुले, आंबेडकर या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र कुठे चालला आहे, असे विचारण्याची वेळ आली आहे. सावित्रीची लेक महाराष्ट्रात शिक्षित झाली. परंतु सुरक्षित झाली का? हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. मागील वर्षभरापासून राज्यातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर वेगवेगळे अत्याचार होत आहेत. या अत्याचाराबाबत सरकारला, संपुर्ण यंत्रणेला कि आपल्या मानसिकतेला दोषी धरायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वैष्णवी हगवणे यांची झालेली हत्या नक्की कशामुळे झाली, याबाबत पोलीस यंत्रणा अद्यापही स्पष्ट भूमिकेत नाहीत. सुषमा अंधारे आणि ॲड. रुपाली ठोंबरे यांनी हे प्रकरण योग्य पध्दतीने हाताळल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ज्या सरकारच्या आदेशावर ही यंत्रणा चालते. त्या सरकारमधल्याच काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच यंत्रणेवर टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नक्की कोणाच्या हातात सुरक्षित आहे, असा विचारण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर असे दिसून येत आहे, की पोलीस यंत्रणा निष्काळजी राहिली आहे. या आरोपींना तातडीने पकडले असते, तर या घटनेची पारदर्शकता महाराष्ट्रात दिसून आली असती. वैष्णवीसारख्या अनेक मुलींचा आजही समाजात दुर्देवी मृत्यू होत आहे. वैष्णवीला न्याय देण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी, सक्षम सरकारी वकील अपेक्षित आहे. निरपेक्षपणे या प्रकरणाकडे बघण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुशिक्षित झाली. परंतु सुरक्षित राहू लागली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणा कमी पडते, की सरकारचे राजकारण आडवे येत आहे? असा संतप्त सवालही ॲड. मानसी म्हात्रे यांनी उपस्थित केला.
महिला आयोगाची भूमिका संशयास्पद
गेल्या वर्षात दोन वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला आयोगाने नक्की काय भूमिका बजावली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महिला सुरक्षेवर काम करणे गरज असताना महिला आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. महिला सुरक्षेबाबत जो हलगर्जीपणा केला जात आहे, त्या विरोधात एक मोठे आंदोलन महिलांनी करण्याची गरज आहे. आपल्या न्याय हक्कासाठी महिलांनी एकत्र येणे आवश्यक आहे आणि म्हणूनच शेकाप महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका राहणार आहे.
सक्षम तपास अधिकारी, सरकारी वकील द्यावा
पुणे येथे वैष्णवी हगवणे या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत खुप मोठे राजकारण केले जात आहे. वैष्णवीसारख्या अनेक मुलींचे बळी जात आहेत. त्याला आत्महत्या हे गोंडस नाव दिले जात आहे. परंतु, पोलीस यंत्रणा सक्षमपणे तपास करण्यास अपयशी ठरत आहे. आत्महत्या आहे? हुंडाबळी आहे? की खून आहे, हे स्पष्ट होत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून होत असलेल्या चर्चेतून हगवणे कुटूंबियांनी वैष्णवीचे लग्न झाल्यापासून तिचा मृत्यू होईपर्यंत सातत्याने पैशाची व विविध वस्तूंची मागणी केल्याचे दिसून येत आहे.
ही आत्महत्या नसून हुंडाबळी आहे. वैष्णवीच्या अंगावर असलेल्या जखमा हा तिचा खून सरकारने विशेष पथकाची नेमणूक करणे. सक्षम अधिकाऱ्यांकडे तपास दिला पाहिजे. योग्य बाजू मांडणारे सक्षम सरकारी वकील सरकारने दिल्यास नक्की वैष्णवीला न्याय मिळेल, असा विश्वास शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.
वैष्णवी हगवणेचा या भगिनीचा मृत्यू हा मनाला क्लेश देऊन गेला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिच्या सासरच्या मंडळींची भूमिका आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय यंत्रणेसोबत महिला आयोगाच्या रूपाली चाकणकरांचे बोटचेपे धोरण क्लेशदायक आहे. रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेतील दोषींना सक्त शासन व्हावे, याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अशा घटना पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत, यावर निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासन हतबल होताना दिसत आहे. माय-माऊलींचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या दुबळ्या सरकारचा शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र निषेध करत आहोत.
शिवानी संतोष जंगम
अध्यक्ष रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप