| अलिबाग | प्रतिनिधी |
आवास येथे जून्या वादातून दोन गटात गुरुवारी (दि.22) रात्री सशस्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात धर्मेंद्र राणे यांचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आवास येथे गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार विवेक राणे हे घरासमोरील शेडमध्ये चारचाकी वाहन पार्कींग करीत होते. जून्या भांडणाचा राग धरून चाकू, तलवारीने राणे कुटूंबियावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना शिवीगाळी करून त्यांच्यावर चाकू, सुरा व तलवारीने वार करण्यात आले.यामध्ये धर्मेंद्र राणे यांचा मृत्यू झाला. पुर्ववैमन्यास्यातून झालेल्या या वादामुळे एकाचा जीव गेला असून तिघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांनी दिली.
आवासमध्ये तणावाचे वातावरण
अलिबाग तालुक्यातील आवासमध्ये दोन गटात झालेल्या वादात एका कुटूंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणे कुंटूबियामध्ये दुःखाचे डोंगर कोसळले आहे.