अनेकांचे संसार उद्ध्वस्त
| रायगड | प्रतिनिधी |
छप्पर उडाले, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले अन् अनेकांचा संसार खुल्या आभाळाखाली आला. अशी भयाण अवस्था मान्सूनच्या पहिल्याच पावसाने अनेकांची केली आहे. नेहमीपेक्षा 15 दिवस अगोदर दाखल झालेल्या मान्सूनने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तब्बल 273 घरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर एक झोपडी आणि एका गोठ्याची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील दोन आरोग्य केंद्रे, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी, एक पोल्ट्री अशा एकूण 11 ठिकाणी आर्थिक नुकसानीबरोबरच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

रायगड जिल्ह्यात मागील 24 तासांत 160.45 मिमी. इतका सरासरी पाऊस पडला असून, म्हसळा-282 मिमी., मुरुड-251.00 मिमी., पनवेल- 245.2 मिमी., अलिबाग- 241.0 मिमी., इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पाऊस तुरळक प्रमाणात सुरु असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहात असून, पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते व रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
अलिबाग तालुक्यातील शिरवली येथील भरत तुकाराम म्हात्रे यांच्या घरावर झाडाची फांदी पडून पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. खंडाळा येथील 24 घरांचे पत्रे उडून पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. चिंचवली येथील संजय सीताराम नाखवा यांच्या घरासमोरील वायरवर वीज पडून शॉर्टसर्किट होऊन घरातील इलेक्ट्रिक मीटरवर घरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग-रोहा रस्त्यावर ढवर गावाजवळ रस्त्याच्या कडेला गुलमोहरचे पडलेले झाड काढण्यात आलेले असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महाजने-बेलोशी गावांना जोडणारा पूल अपूर्ण राहिल्याने संपर्क तुटला होता. वेश्वी येथील वैशाली वसंत राऊत यांच्या घराचे कौले व पत्र्याचे नुकसान झाले आहे. वाडगाव येथील नितेश नथुराम सुतार, सतीश नथुराम सुतार, जयेंद्र हरिश्चंद्र सुतार यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. आदिवासीवाडी वडगाव येथे कच्च्या कुडामेढीचे घर पडले.

मुरुड तालुक्यातील काशीद येथे विजेचा खांब रस्त्यावर पडला होता. मुरुड येथे पडलेले झाड हटविण्यात आले असून, वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मुरुड येथील विहूर येथे रस्त्यावर झाड पडलेले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गवळीवाडी कोंडेपंचतन, बोर्लीपंचतन, वांजळे, हरिजन वस्ती येथे रस्त्यावर दरड पडली होती. दरड बाजूला करण्यात आली असून, रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे, नौपाडा येथील वाडीमध्ये सकाळी साचलेले पाणी महानगरपालिका कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून पाण्याचा निचरा करण्यात आला. भाताण येथील चंद्रकांत भोईर यांच्या घरावर अतिवृष्टीमुळे संरक्षित भिंत कोसळून नुकसान झाले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. वाकडी आदिवासीवाडी येथील चिमी सदू वाघ यांच्या घराची भिंत कोसळली, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

माणगाव तालुक्यातील तलाठी सजा उणेगाव, उणेगाव येथील गणेश लक्ष्मण महाडिक यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे. तलाठी सजा माणगाव येथे नुकसान झाले. सुधागड तालुक्यातील साई येथील नियाज अब्दुल्ला कोंडविलकर यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे. तालुक्यात तीन घरांचे अंशतः नुकसान झाले असून, एक म्हैस व एक बकरीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील गोलदरा येथील रमेश राजाराम शेलार यांच्या पक्क्या घराची संरक्षण भिंत पडून घराचे अंशतः नुकसान झाले आहे. म्हसळा तालुक्यातील वरवठणेकोंड येथील सचिन वसंत जंगम यांच्या घराची भिंत व इतर गोष्टीचे नुकसान झाले आहे. मुरुड तालुक्यातील मिठेखार येथील रमाकांत रामचंद्र घाग यांच्या घराची कौले फुटून नुकसान झाले आहे. डाकेली येथील वनिता हरिश्चंद्र घडशी व सुभाष बाळ्या घडशी यांच्या घराची कौले फुटून नुकसान झाले आहे. आगरदांडा बुद्धवाडी स्मशानभूमी भिंत पडली आहे. चिंचवली शेकीन येथे असलेले आयटीआय कॉलेज पाण्याने भरले होते. तळा तालुक्यात दोन पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. पेण तालुक्यातील सोनखार येथील गणपत तुकाराम म्हात्रे यांच्या भात खरेदी केंद्राचे पावसाच्या पाण्याने भात भिजून भाताचे नुकसान झालेले आहे. कर्जत तालुक्यातील बिरदोले गावामधील रोशन कालेकर शेतामध्ये गेला असता त्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. कळंब येथील 25 ते 30 घरांचे पत्रे उडाले आहेत, तसेच काही घरांच्या भिंती पडल्या आहे. उरण तालुक्यातील चिरनेर, सारडे, वशेणी येथील काही घरांचे पत्रे उडाले असून, नुकसान झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोरडी ठाणे ते रेवस रेड्डी मार्गावर शेखाडी गावाजवळ मोठे व दगड व माती रस्त्यावर आली होती. सदर दरड हटविण्यात आल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.