राज्य कृषी आयुक्तालयाचा पुढाकार
। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यात शेतकर्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे शेतकर्यांच्या कृषी निविष्ठांशी संबंधित तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, सोमनाथ पिंजारी (संपर्क: 8329073934) यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. या पथकात विश्वास बर्वे (उपविभागीय कृषी अधिकारी, संपर्क: 9403510075), ए. जे. राऊळ (मोहीम अधिकारी, संपर्क: 9049497339), काकासाहेब भालेकर (निरीक्षक वजने व मापे, संपर्क: 8425037686) आणि लक्ष्मण लामकाने (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, संपर्क: 9921543499) हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषी अधिकारी (पथक प्रमुख), कृषी अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे. ही पथके तालुकास्तरावर शेतकर्यांच्या तक्रारींचे निवारण करतील. या पथकामध्ये कृषी निविष्ठांशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी वरील संपर्क क्रमांकांवर थेट पथक प्रमुखांशी संपर्क साधता येणार आहे.
जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख सोमनाथ पिंजारी यांनी शेतकर्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा मिळाल्या असतील किंवा फसवणुकीचा अनुभव आला असेल, तर त्यांनी तातडीने जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय भरारी पथकांशी संपर्क साधावा. शेतकर्यांनी आपल्या तक्रारी नोंदवून त्यांचे त्वरित निवारण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांच्या कृषी निविष्ठांशी संबंधित समस्यांचे त्वरित आणि प्रभावी निवारण मिळण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
प्रभावी यंत्रणा उपलब्ध
कृषी विभागामार्फत शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून या भरारी पथकांमुळे शेतकर्यांना तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, शेतकर्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.