भरावाचा भातशेतीला फटका
| अलिबाग | प्रतिनिधी |
उसर येथे गुरचरण जागेत प्रस्तावित मेडिकल कॉलेजचे काम सुरु झाले आहे. ठिकठिकाणी भराव करण्यात आला. भरावाचा फटका बाजूला असलेल्या भातशेतीला बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे पाणी शेतांमध्ये भरले आहे. त्यामुळे भातशेती उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरीवर्गात नाराजीचे सूर उमटत आहेत.
उसर येथील 53 एकर गुरचरण जागेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे बांधले जाणार आहे. या जागेवर प्रशासकीय इमारत आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधले जाणार आहे. महाविद्यालयाची इमारत बांधण्यात येणाऱ्या जागेच्या बाजूने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मार्ग आहे. हा मार्गच बंद करण्यात आला आहे. परंपरागत वहिवाटीचा रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत भराव टाकून बंद करण्यात आला आहे. उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू केले आहे. ठिकठिकाणी मातीचा भराव टाकण्यास सुरुवात झाली आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या बाजूला 45 एकर शेतजमीन आहे. 50 हून अधिक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये भात, वाल, हरभरा अशा अनेक पिकांची लागवड करतात.
रायगड जिल्ह्याला शनिवारपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली. प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे तसचे पूर्ववत पाण्याचे स्त्रोत बंद केल्याने पावासाचे पाणी बाजूला असलेल्या पिकत्या शेतजमिनीत साचू लागले आहे. भातासह इतर पिकांची रोपे पाण्याखाली गेली आहेत. शेती पूर्णतः पाण्याने भरली आहे. परिणामी, पिकती जमीन नापिक होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्प उभारत असताना पिकत्या शेतजमिनी नापिक होत असल्याने शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु झाले आहे. माती भरावासह वेगवेगळ्या ठिकाणी काँक्रिटीकरण सुरु आहे. मात्र, रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बाजूला असलेली शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. प्रचंड नुकसान झाले. शेतामध्ये भातबियाणांची पेरणी केली असून, रोपांना अंकुर फुटले आहेत. मात्र, शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
मयूर खंडागळे,
शेतकरी
उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने भराव केल्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची तक्रार केली होती. याबाबत बैठकही झाली होती. संबंधित ठेकेदाराला सूचना करून कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
पूर्वा पाटील, अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय