। पेण । प्रतिनिधी ।
कोरोनामुळे दीर्घकाळ शाळा बंद होत्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या शैक्षणिक वर्षापासून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, वर्षभरात पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने परिणामी स्कूलबसच्या भाड्यामध्ये 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, कळत-नकळत याचा फटका पालकांच्या खिशावर पडणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्कूलबसची सेवा बंद होती. टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू झाल्यानंतर पालकच मुलांची शाळेतून ने-आण करीत होते. परंतु, आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नोकरदार पालकांना मधल्या वेळेत आपल्या पाल्यांला घरी आणणे अडचणीचे होऊ शकते. परिणामी, त्यांनी स्कूलबसकडे धाव घेतली. पण, तब्बल 30 टक्के भाडेवाढ झाली असल्याने पालकांना आता जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत.
पूर्वी एका विद्यार्थ्यासाठी साधारण 700 रूपये घेतले जात होते. आता कोरोनानंतर स्कूलबस, व्हॅन, रिक्षाचालकांनी 900 रूपये घ्यायला सुरूवात केली आहे. कारण, कोरोनाकाळात वाहनचालकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच राज्य सरकारने स्कूल बसचा दोन वर्षांचा रोड टॅक्सही माफ केलेला नाही. वाढती महागाई, डिझेलचे दर सतत वाढत असल्यामुळे 30 टक्के भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे स्कूलबसवाल्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यातच इंधनाचे दर 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. दोन वर्षे गाड्या बंद असल्याने मेन्टेनसचा खर्चदेखील वाढला. तरीदेखील पालकांना परवडेल याचा विचार करूनच 30 टक्के भाडेवाढ केली आहे. 2019 पर्यंत प्रतिविद्यार्थ्यामागे 700 रूपये दरमहा आम्ही घेत होतो, परंतु या वर्षापासून 900 रूपये भाडे आकारत आहोत.
आनंद सत्वे, सचिव, रायगड जिल्हा वाहतूक संघटना
एकीकडे महागाई वाढत आहे. त्यातच स्कूलबसचे भाडे वाढल्याने महिन्याचे आर्थिक गणित कोलमडणार असून, सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्याला बसने पाठविणे थोडे महागच वाटत आहे
वृशाली म्हात्रे, पालक