४४ वी चेस ऑलिम्पियाड; शुभम म्हात्रे टीम लीडर, तर श्रेयस पाटील स्वयंसेवक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारताला अभिमान वाटेल अशी ४४ वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा २८ जुलै ते ९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाबलीपुरम, चेन्नई, तामिळनाडू येथे होत आहे. या स्पर्धेसाठी भारताने सर्व अटी आणि निकष पूर्ण केल्यानंतर जागतिक बुद्धिबळ महासंघाने अत्यंत विश्वासाने ही स्पर्धा भारतात प्रथमच खेळविण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत १८८ पेक्षा जास्त देश सहभागी होत आहेत. जवळजवळ १७५० स्पर्धक भाग घेत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी २५ टीम लीडर आणि ७०० पेक्षा जास्त स्वयंसेवक यांची संपूर्ण भारतातून इंटरव्ह्यू घेवून नेमणूक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामधून अलिबागचा शुभम सूर्यकांत म्हात्रे ह्याची टीम लीडर म्हणून निवड झाली आहे, तर पनवेल चा श्रेयस चंद्रशेखर पाटील याची स्वयंसेवक म्हणून निवड झाली आहे. श्रेयस पाटील हे बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आहेत. तर शुभम सूर्यकांत म्हात्रे हे बुद्धिबळातील राज्य पंच आहेत.

श्रेयस चंद्रशेखर पाटील चांगा कान्हा ठाकूर कॉलेज चा विद्यार्थी आहे तर शुभम सूर्यकांत म्हात्रे पुण्यातील सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट चा विद्यार्थी आहे. या सर्वांचे प्रशिक्षण २१ जुलै ते २७ जुलै पर्यंत महाबलीपुरम येथे होत आहे . भारतातील सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम या साठी तयार करण्यात आले आहे. साधारणतः ४४००० स्क्वेअर फुटाचा हा हॉल आहे. तो पूर्णपणे साऊंडप्रुफ असणार आहे. रायगड मधून निवड झालेले शुभम आणि श्रेयस यांचे विलास म्हात्रे, अध्यक्ष, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना, सर्व पदाधिकारी, तसेच खेळाडू, हितचिंतक यांचे कडून खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

Exit mobile version