फणसाड अभयारण्यात 46 पक्ष्यांच्या नोंदी

ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांची यशस्वी मोहीम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

फणसाड पक्षी गणना हा ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांचा दिर्घकालीन पक्षी निरीक्षण उपक्रम असून तो स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या शाश्वत सहभाग, पुनर्संचयन आणि वन्यजीव संरक्षण याद्वारे संवर्धन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या ठाणे वन्यजीव विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रम शास्त्रीय पद्धतीने 37 पक्षी निरीक्षक, ग्रीन वर्क्स ट्रस्टचे 22 स्वयंसेवक आणि फणसाड वन्यजीव अभयारण्यातील 18 वन कर्मचाऱ्यांच्या सहभागाने व ठाण्याचे उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक फणसाड वन्यजीव अभयारण्य मनोहर दिवेकर, परिक्षेत्र वन अधिकारी फणसाड वन्यजीव अभयारण्य मुरूड नितीन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी 15 वेगवेगळ्या राज्यांमधून 150 नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 10 राज्यांतील 37 पात्र सहभागी निवडण्यात आले. हे सहभागी शिक्षक, वेलनेस फॅसिलिटेटर, सरकारी कर्मचारी, कलाकार तसेच विद्यार्थ्यांसारख्या विविध क्षेत्रांतील होते. यातुन 13 संघ तयार करण्यात आले होते. प्रत्येक संघात 3 पक्षी निरीक्षक, 1 ग्रीन वर्क्स ट्रस्ट स्वयंसेवक आणि 1 वनरक्षक यांचा समावेश होता. या संघांनी फणसाड वन्यजीव अभयारण्यातील 26 ठिकाणांनी भेट देऊन विविध निरीक्षणे नोंदवली. यामध्ये राखाडी धनेश, जर्सनचा रात्रचरा पक्षी ,मास्कीचा बिळात राहणारा बेडूक,कोतवाल पक्ष्याच्या प्रजाती सर्व 6 प्रजाती, तसेच रातवा पक्ष्याच्या सर्व 4 प्रजाती, फुलटोच्या पक्ष्याच्या सर्व 3 प्रजाती तसेच धनेश पक्ष्याच्या सर्व 4 प्रजाती नोंदवल्या गेल्या ज्यात दुर्मिळ अशा महाधनेश, श्रीलंका फ्रॉगमाउथ, बार-विंग्ड फ्लायकॅचर-श्राइक, कॉमन हॉक-कुकू, मोटल्ड वुड-आउल यांसारख्या काही विशेष पक्ष्यांचीही नोंद झाली सदर उपक्रमात पक्षी, फुलपाखरे, सरीसृप, उभयचर आणि सस्तन प्राणी एकूण 2278 नोंदी करण्यात आल्या.

यावेळी उपवनसंरक्षक, वन्यजीव, ठाणे राहुल गवई,सहाय्यक वनसंरक्षक, फणसाड वन्यजीव अभयारण्य मनोहर दिवेकर ,परिक्षेत्र वन अधिकारी, फणसाड वन्यजीव अभयारण्य मुरूड नितीन ढगे, डॉ. निखिल भोपळे सर्वेश अभ्यंकर आदिंसह वनरक्षक, वनपाल उपस्थित होते.

फणसाड वन्यजीव अभयारण्यात वर्षभरात 250 पेक्षा अधिक पक्षी प्रजाती आढळतात. 2026 च्या वसंत ऋतूतील मोजणीत खालील नोंदी करण्यात आल्या. 53 कुलांमधील 154 पक्षी प्रजाती,6 कुलांमधील 50 फुलपाखरांच्या प्रजाती,10 कुलांमधील 24 सस्तन प्राणी प्रजाती,9 कुलांमधील 20 सरीसृप प्रजाती,6 कुलांमधील 13 उभयचर प्रजाती, नोंद करण्यात आल्या. तसेच धोकादायक प्रजाती: ग्रीन इम्पीरियल-पिजन, मलबार पायड हॉर्नबिल, असुरक्षित प्रजाती: मलबार ग्रे हॉर्नबिल, ग्रेट हॉर्नबिल,24 अनुसूची आणि 127 अनुसूची पक्षी प्रजाती नोंदल्या गेल्या. भारतासाठी प्रदेशनिष्ठ स्थानिक असणाऱ्या 10 तर पश्चिम घाटासाठी प्रदेशनिष्ठ असणाऱ्या 5 प्रजातींची नोंद केली गेली.

ग्रीन वर्क्स ट्रस्ट पक्षी गणना हा नागरिक विज्ञानावर आधारित दीर्घकालीन उपक्रम आहे. या माध्यमातून संकलित होणारी माहिती अभयारण्यातील महत्त्वाच्या अधिवासांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणारी आहे.या माहितीच्या विलेषणातुन जैवविविधतेची सखोल माहिती मिळेल काळानुसार होणारे बदल आणि प्रभावी संवर्धन आणि संरक्षणासाठी योग्य व्यवस्थापन धोरणे तयार करण्यात मदत होईल, असे मत डॉ. निखिल भोपळे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version