| आगरदांडा | प्रतिनिधी |
वन्यजीव सप्ताहानिमित्त कोंकण उन्नती मित्रमंडळाचे, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, बॅरिस्टर ए. आर. अंतुले शैक्षणिक संकुल, मुरुड-जंजिरा व फणसाड वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड वन्यजीव अभयारण्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत एकूण 67 विद्यार्थी व 11 प्राध्यापक यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभर वन्यजीव सप्ताहाचे विविध उपक्रम राबवले जात असून, फणसाड वन्यजीव अभयारण्यात ही या निमित्ताने अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांत प्रत्यक्ष सहभाग घेऊन वन्यजीव संरक्षणाबाबत ज्ञान वाढविले. जंगलात भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांना वनस्पती, झाडे, फुलपाखरे, पक्षी, कीटक, सरीसृप, बुरशी इत्यादी जैवविविधतेच्या घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणातून निसर्गाचा समृद्ध वारसा अनुभवला. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवांवरील माहितीपूर्ण पीपीटी सादरीकरण आणि शैक्षणिक चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. यातून वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन या विषयांवर विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती फणसाड वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी- नितीन ढगे आणि कर्मचारी यांनी केले. त्यात प्रदीप बागवे, सदानंद नाईक, आदेश पोकळ, भामरे आणि आरोटे या वनकर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ग्रीन वर्क्स ट्रस्टचे आकाश म्हैसधुणे, शिवानी पुजारी आणि प्रा. प्रणव बागवे यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षण व वन्यजीव अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमासाठी प्राचार्य जनार्दन कांबळे, डॉ.श्रीशैल बहिरगुडे, डॉ.गजानन मुनेश्वर, डॉ.नारायण बागुल, डॉ. सीमा नाहीद, प्रा. प्रणव बागवे, प्रा. सिद्धेश सतविडकर, प्रा. चिंतन पोतदार, प्रा. मुस्कान रज्जब, प्रा. रुफी हसवारे आणि प्रा. प्रवेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फणसाड वन्यजीव अभयारण्य, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीतून निसर्ग संवर्धनाबाबत मौल्यवान ज्ञान आणि प्रेरणा मिळविली. वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि पर्यावरणाभिमुख अनुभव ठरली. असे मत डॉ. जनार्दन कांबळे यांनी केले.







