। मुंबई । प्रतिनिधी ।
कोस्टल रोडवर एक भीषण अपघात घडला आहे. वरळी येथे कोस्टल रोडवर कारचा अपघात झाला असून, अपघात इतका भीषण होता की, इर्टिका कार पुलाची रेलिंग तोडून कार सरळ समुद्रात कोसळली. सोमवारी (दि. 6) रात्री उशिरा ही घटना घडली असून, सुदैवाने यात कारचालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक वेगाने वरळीहून वांद्र्याच्या दिशेला जाताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाची रेलिंग तोडून सरळ समुद्राच्या पाण्यात कोसळली. सुदैवाने कारमध्ये चालक एकटाच होता. कार पाण्यात पडल्याचे पाहताच गस्तीवर असलेल्या जवानांनी वेळीच पावलं उचलत चालकाचा प्राण वाचवला आहे. कार चालकाचे नाव फ्रशोगर दारायुश बत्तीवाला (28) असे असून, त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात फ्रशोगर किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात फ्रशोगर किरकोळ जखमी झाला असून, त्याचा उपचारासाठी पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर कार 30 फुटावरुन खाली समुद्रात पडल्याने काही क्षणातच तळ गाठला होता. कार पाण्यात पडल्याचे लक्षात येताच तिथे कर्तव्यावर तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान मदतीला धावले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट समुद्रात उडी घेतली. खोल पाण्यात जाऊन सुरक्षा जवानांनी चालकाला रस्सीच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. याबाबत स्थानिक वरळी पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. दरम्यान, चालकाने मद्यप्राशन केले होते का यासंबंधी तपास पोलिसांकडून केला जात आहे.







