रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी निवडणूकांच्या प्रक्रीयेला रंग चढू लागला आहे. बुधवारी अर्ज मागे घेतल्यानंतर 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. परिणामी उर्वरित 190 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 481 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सरपंच पदाच्या 338 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. 18 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत सरपंच पदासाठी 880 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी 5 डिसेंबर रोजी करण्यात आली. या छाननीत 11 अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर अर्ज मागे घेण्याच्या 7 डिसेंबर पर्यंतच्या मुदतीत 338 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 531 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले असून, 50 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी केवळ 1 उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित 190 ग्रामपंचायतींसाठी 481 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशिब आजमावित आहेत.

सर्वाधिक बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत महाड तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पोलादपूर तालुक्यातील नऊ, म्हसळा सात, श्रीवर्धन चार, माणगाव तीन, पेण दोन, मुरुड, उरण, खालापूर प्रत्येकी एका ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

दरम्यान प्रशासनाने उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले असून, उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकडे जोर देण्यात येत आहे.

Exit mobile version