द्रुतगती महामार्ग वेळेत पूर्ण झाल्याने उत्तर प्रदेशातील महामंडळाला 614 कोटींचा लाभ

। लखनऊ । वृत्तसंस्था ।
रखडणारे प्रकल्प आणि त्यांच्या वाढणार्‍या भरमसाठ किंमती या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पंरपरेला छेद देताना केवळ निर्धारित वेळेतच नाही तर प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच 614 कोटींचा घसघसीत नफा देणार्‍या ङ्गपूर्वाचल पॅटर्नफची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लखनऊ- सुलतानपूर-गाजीपूर हा पूर्वाचल एक्सप्रेस वे अर्थात शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग नियोजनाप्रमाणे अवघ्या 36 महिन्यांत पूर्ण झाला असून त्यावरील खर्चही अंदाज खर्चापेक्षा 5.19 टक्यांनी कमी झाला आहे. अशा प्रकारचा हा सुरुवातीपासूनच नफा देणारा पहिलाच रस्ते विकास प्रकल्प असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकार करीत आहे.
उत्तर प्रदेशातील पूर्वाचल प्रदेश जसा माफियाराजसाठी बदनाम होता तसाच तो अविकसित प्रदेश म्हणूनही देशाच्या नकाशात ओळखला जात होता.विद्यमान भाजप सरकारने मात्र राज्याच्या सर्वागिण विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला असून बुंदेलखंड, गोरखपूर, गंगा आणि आगरा- लखनऊ या चार एक्सप्रेस वे महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र पूर्वाचल एक्सप्रेस वे हा के वळ राज्यालाच नव्हे तर देशालाही मार्गदर्शक ठरणारा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याचा दावा ङ्गउत्तर प्रदेश एक्सप्रेस वे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीफचे अध्यक्ष आणि गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिली. पूर्वाचलमध्ये दूध,भाजीपाला तसेच कृषीमालाचे उत्पादन होते. मात्र या भागात रस्ते आणि दळणवळणाची साधने नसल्याने शेती उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे पूर्वाचल आणि बिहारलाही लखनऊ आणि थेट दिल्लीपर्यत महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात आला आहे. 341 किमी लांबीचा हा महामार्ग लखनऊ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, अंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाजीपूर या जिल्हयांना जोडत बिहारच्या सिमेपर्यंत जातो.
सध्या सहा पदरी असलेल्या या महामार्गाचा आठ पदरी विस्तार करण्याची योजना असून त्यावर विविध 21 ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. त्यातून पहिल्या ठप्यात 15 ते 20 हजार कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या महामार्गाची उभारणी अवघ्या 36 महिन्यात 22 हजार 500 कोटी रूपयांत करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प विशेषत: महामार्गाची बांधणी करतांना भूसंपादन,अन्य परवानग्या तसेच प्रकल्पाचे बांधकाम यामुळे हे प्रकल्प वर्षांनुूवर्षे रखडतात. मात्र पूर्वाचल एक्सप्रेस वे करोनामुळे अनेक अडचणी येऊनही नियोजित वेळेत पूर्ण झाला. विशेष म्हणजे यासाठी निविदा काढण्यात आल्या तेव्हा अंदाजखर्चापेक्षा अधिक दराच्या निविदा येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आम्ही हे काम अंदाजखर्चापेक्षा 5.19 टक्के कमी दराने करून घेतले. त्यामुळे या महामार्गाचे लोकार्पण होत असतांनाच महामंडळास 614 कोटींचा लाभ झाल्याचे अवस्थी यांनी सांगितले.

Exit mobile version